फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील मानसशास्त्र विभागात ४ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिन अत्यंत उत्साहात आणि नवकल्पनांनी समृद्ध अशा पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक बनून अध्यापनाची भूमिका निभावत एक आगळावेगळा उपक्रम सादर केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. कल्पना एल. पाटील (हिंदी विभाग प्रमुख व उपप्राचार्य) यांनी भूषवले. त्यांच्यासोबत व्यासपीठावर प्रा. डॉ. सीमा बारी आणि प्रा. धीरज खैरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना डॉ. सीमा बारी यांनी उपक्रमाच्या उद्दिष्टांविषयी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी मानसशास्त्रातील विविध विषयांवर स्वतः अध्यापन करत शिक्षक दिनाचा खरा अर्थ साकार केला. द्वितीय वर्षातील चेतना नितीन पाटील हिने ‘मानसशास्त्रीय चाचणीच्या सहाय्याने व्यक्तिमत्व समजून घेणे’ या विषयावर प्रभावी सादरीकरण केले. सादिया फिरोज तडवी हिने ‘आरोग्य आणि ताण व्यवस्थापनासाठी जीवन कौशल्यांचा उपयोग’ या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तर तृतीय वर्षातील सानिया मुबारक तडवी हिने ‘मानसशास्त्रीय संशोधनाचा समाजातील उपयोग’ या महत्त्वाच्या विषयावर सखोल विवेचन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ. कल्पना पाटील यांनी शिक्षकाचे आयुष्यातील महत्त्व स्पष्ट करताना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी उदाहरण दिले. त्यांनी मानसशास्त्रातील पावलॉव्हच्या साहचर्य सिद्धांताचे विवेचन करत, व्यक्तीच्या वर्तन व मानसिकतेतील बदलाचे मानसशास्त्रीय विश्लेषण केले. याशिवाय, त्यांनी नेपोलियन बोनापार्ट, अरुणिमा सिन्हा, कल्पना चावला आणि बचेंद्री पाल यांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन, प्रयत्नशीलता आणि ध्येयाशी प्रामाणिक राहण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी कुमारी सानिका संजय मेढे हिने मनोगत व आभार प्रदर्शन करत शिक्षक दिनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे आभार मानले. या उपक्रमात विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने अध्यापनाचे अनुभव घेतल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास हातभार लागल्याचे प्राध्यापकांनी नमूद केले.



