जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ज्येष्ठ पत्रकार हेमंत शंकरराव काळुंखे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेमंत काळुंखे हे सध्या दैनिक साईमतमध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. आज रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला. दैनिक जनशक्ती मधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केलेल्या काळुंखे यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये आपल्या गुणवत्तेची मोहर उमटवली. तर, गेल्या सतरा वर्षांपासून ते दैनिक साईमतमध्ये कार्यरत होते.

हेमंत काळुंखे यांची कला, संस्कृती, नाट्य, चित्रपट आदींची विशेष आवड होती. प्रामुख्याने त्यांची चित्रपटविषयक समीक्षणे आणि दिग्गज कलावंतांच्या मुलाखती खूप गाजल्या होत्या. त्यांच्या माध्यमातू न जळगाव जिल्ह्याच्या पत्रकारितेतील एक ज्येष्ठ व्यक्तीमत्तव काळाच्या आड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी दहा वाजता खेडीतील पत्रकार कॉलनीतल्या राहत्या घरून निघणार आहे. हेमंत काळुंखे यांना लाईव्ह ट्रेंडस न्यूज परिवाराच्या वतीने आदरांजली !



