
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पी. एम. उषा – सॉफ्ट कॉम्पटेंट’ अंतर्गत एकदिवसीय आदिवासी समाज विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आदिवासी समाजापुढील विविध समस्यांवर आणि त्यावरच्या उपायांवर सखोल चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख होते, तर एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले.

सरकारच्या योजनांची माहिती
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. अपुरी संसाधने, भाषेचा अडथळा आणि जात प्रमाणपत्र मिळवण्यातील अडचणींवर मात करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण देणे, मूलभूत सुविधा वाढवणे आणि शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आदिवासी भागांमध्ये शासनाच्या अनेक योजना पोहोचल्या नसल्याचे सांगत या भागांत जनजागृती आणि लोकसहभाग वाढवणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समस्या
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. लता मोरे यांनी आदिवासी महिलांच्या जीवनकौशल्यांवर मार्गदर्शन केले. महिलांचे आर्थिक, आरोग्य आणि शिक्षणासंदर्भात सक्षमीकरण करणे, तसेच राजकीय आणि सामाजिक सहभाग वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात प्रा. डॉ. मोहन पावरा यांनी आदिवासी समाजाच्या आर्थिक समस्यांवर प्रकाश टाकला. रोजगाराच्या संधी आणि शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित
अनिल पाटील यांनी चौथ्या सत्रात आदिवासी समाजापुढील सामाजिक समस्यांवर भाष्य केले. यामध्ये जमिनीचे विस्थापन, शिक्षणाचा अभाव, गरिबी, बेरोजगारी आणि आरोग्य सेवांची अनुपलब्धता यांसारख्या समस्यांचा समावेश होता. या समस्यांवर मात करण्यासाठी आदिवासी समुदायाने आपल्या संस्कृतीचे जतन करणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कमरीन शेख यांनी केले, तर प्रा. डॉ. समाधान पाटील यांनी आभार मानले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. आर. बी. देशमुख, प्रा. घनश्याम पाटील, प्रा. धनंजय रायसिंग, प्रा. विशाल पाटील आणि प्रा. गणेश देशमुख यांनी परिश्रम घेतले.



