जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत एका गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीला मंगळवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता तांबापूरा परिरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून तब्बल १५ किलो ५२५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ९३ हजार १५० रुपये इतकी आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील मच्छीबाजार, तांबापुरा परिसरात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात गांजा बाळगून त्याची चोरटी विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ एक विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. तांबापुरा येथील एका घरात तो असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी मंगळवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता त्या घराला चारही बाजूंनी वेढा घालून सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागण्याआधीच त्यांनी आरोपीला बाहेर येण्यास सांगितले. पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव महमूद शेख मेहबूब (वय ५९, रा. मच्छीबाजार, तांबापुरा) असे सांगितले.

पोलिसांनी संशयिताची चौकशी केली असता, त्याच्या घरात दोन गोण्यांमध्ये ९३ हजार १५० रुपये किमतीचा १५ किलो ५२५ ग्रॅम गांजा आढळला. सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांनी तात्काळ शासकीय पंच, वजनकाटाधारक आणि फॉरेन्सिक व्हॅनला घटनास्थळी बोलावून पंचनामा केला. सर्व गांजा आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



