सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा शहरात पारंपरिक लोकसंस्कृतीचा वारसा जपणारा भुलाबाई महोत्सव येत्या १० सप्टेंबर रोजी भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवसंवर्धिनी आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल, सावदा येथे हा महोत्सव संपन्न होणार आहे.
गणपती विसर्जनानंतर सुरू होणारा आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणारा भुलाबाईचा पारंपरिक उत्सव आपल्या ग्रामीण आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. आजच्या काळात ही परंपरा हळूहळू लुप्त होत चालली असताना, ती पुन्हा नव्याने रुजवण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.

या भुलाबाई महोत्सवात शाळकरी मुलींपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वजण समूहाने सहभागी होऊ शकतात. प्रत्येक समूहात किमान १२ सदस्य असावेत, तसेच वाद्य, साहित्य यांची व्यवस्था स्वतः करावी लागेल. सादरीकरणासाठी तीन मिनिटांचा वेळ देण्यात येईल. यामध्ये पारंपरिक भुलाबाईची गीते, नृत्य सादर करता येतील तसेच त्यात सामाजिक संदेश देखील देता येईल.
महोत्सवाच्या दरम्यान प्रत्येक तीन गटांमधून उत्तम सादरीकरण करणाऱ्या पहिल्या तीन गटांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय सर्व सहभागी गटांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. नावनोंदणी लवकरात लवकर करण्याचे आवाहन आयोजकांनी केले असून, अधिक माहितीसाठी ९९६०५७७६९८ या क्रमांकावर गौरी जोशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांनी केले आहे.



