
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनावर आता मुंबई हायकोर्टाने निर्णायक आणि कठोर भूमिका घेतली आहे. याचिकाकर्ता, राज्य सरकार आणि आंदोलनकर्ते यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, मुंबईतील रस्ते मोकळे करा, आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून हटवा आणि बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना शहरात प्रवेश देऊ नका. या सर्व कारवाईसाठी कोर्टाने सरकारला उद्या दुपारी ४ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलन आज चौथ्या दिवशी दाखल झाले असून, आंदोलनाच्या व्यापामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होत असल्याची कोर्टात गंभीर नोंद झाली. याच पार्श्वभूमीवर कोर्टाने आंदोलकांना आझाद मैदानाबाहेर कुठेही वावरण्यास मज्जाव करत आयोजकांची जबाबदारी निश्चित केली. “५ हजारांपेक्षा अधिक लोकांनी आंदोलनस्थळी जमू नये, आझाद मैदानात सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेतच आंदोलनाची परवानगी आहे, त्यानंतर मैदान रिकामे करणे आवश्यक होते,” असे कोर्टाने स्पष्ट केले.
कोर्टाने पुढे म्हटले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक कोंडी होणे टाळण्यासाठी आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखावे. बाहेरून येणाऱ्या आंदोलकांची संख्या जर वाढत असेल, तर त्यांना मुंबईच्या प्रवेशद्वारांवरच थांबवण्यात यावे. मात्र, त्यांच्या जेवण आणि पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक साहित्य नेता येईल, असेही कोर्टाने नमूद केले.
जरांगेंच्या तब्येतीसंदर्भातही कोर्टाने निर्देश दिले असून, त्यांच्या प्रकृतीत काही बिघाड झाल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. आझाद मैदानात ५ हजार लोकांना अटी व शर्तींसह परवानगी द्यायची असल्यास ती दिली जाऊ शकते, परंतु सर्व नियमांचे पालन बंधनकारक असेल, असा निर्वाळा कोर्टाने दिला आहे.
राज्य सरकारकडून आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न झाला, मात्र कोर्टाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार मान्य ठेवत ते चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सरकारच्या प्रयत्नांना मर्यादा आल्या असून, आता आंदोलन अधिकच संवेदनशील स्थितीत पोहोचले आहे. यासंदर्भात उद्या पुन्हा दुपारी सुनावणी होणार असून, कोर्टाचे निर्देश कायम राहतील, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.



