जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
उपचारादरम्यान मृत्यू
मृत तरुणाचे नाव सादिक मेहमूद पिंजारी (वय ३५, रा. नशिराबाद) असे आहे. सादिक हा मिस्त्रीकाम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. शनिवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता तो नशिराबाद येथील भवानी नगर परिसरात एका बांधकामावर काम करत असताना अचानक दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ स्थानिक नागरिकांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांवर शोककळा
सादिकच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या कुटुंबाने मोठा आक्रोश केला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, संपूर्ण नशिराबाद गावात शोककळा पसरली आहे. सादिकच्या मृत्यूमुळे रुग्णालयात आणि गावात मोठी गर्दी झाली होती. या घटनेचा पुढील तपास नशिराबाद पोलीस करत आहेत.



