Home उद्योग टीओडी मीटरमुळे अकोला परिमंडळातील १.१४ लाख वीज ग्राहकांना मिळाली १५ लाखांची सवलत

टीओडी मीटरमुळे अकोला परिमंडळातील १.१४ लाख वीज ग्राहकांना मिळाली १५ लाखांची सवलत


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महावितरणकडून घरगुती ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट टीओडी (टाईम ऑफ डे) मीटर योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, अकोला परिमंडळातील एक लाखाहून अधिक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेत थेट १५ लाख रुपयांची वीज बिल सवलत मिळवली आहे. १ जुलै २०२५ पासून लागू करण्यात आलेल्या या सवलतीमुळे वीज वापराचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळतो आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी घरगुती ग्राहकांनी दिवसाच्या वेळेत (सकाळी ९ ते संध्याकाळी ५) वीज वापर केल्यास दरात प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपयांपर्यंत सूट मिळते. टीओडी मीटर बसवलेल्या अकोला परिमंडळातील १,१४,२९६ ग्राहकांना फक्त जुलै व ऑगस्ट महिन्याच्या वीज वापरावर १५.२५ लाख रुपयांची सवलत मिळाल्याने या योजनेचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर दिसून आला आहे.

टीओडी मीटर हे अत्याधुनिक डिजिटल मीटर असून, त्याचे वाचन पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने होते. ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर तासागणिक वीज वापराची माहिती मिळते, ज्यामुळे त्यांना वापराचे अचूक नियोजन करता येते. यामुळे वापरावर नियंत्रण मिळवत ग्राहक घरगुती उपकरणांचा वापर जास्तीत जास्त दिवसाच्या सवलतीच्या वेळेत करण्याचा प्रयत्न करतात.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २०२५ ते २०३० या कालावधीसाठी घरगुती ग्राहकांना टीओडी योजनेअंतर्गत सवलतीचे दर मंजूर केले आहेत. त्यानुसार, २०२५-२६ या वर्षासाठी ८० पैसे, २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७-२८ व २०२८-२९ मध्ये ९० पैसे आणि २०२९-३० मध्ये १ रुपया प्रति युनिट सवलत मिळणार आहे. मात्र, ही सवलत फक्त टीओडी मीटर बसवलेल्या ग्राहकांनाच लागू होणार आहे.

हे मीटर पूर्णपणे पोस्टपेड स्वरूपाचे आहेत आणि ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच वीज वापरानंतर बिल मिळते. महावितरणकडून हे मीटर मोफत बसवण्यात येतात व यासाठी कोणतीही आर्थिक जबाबदारी ग्राहकांवर येत नाही. मानवी हस्तक्षेपाशिवाय चालणाऱ्या या प्रणालीमुळे अचूक व पारदर्शक बिलिंग शक्य झाले आहे.

ग्राहकांना अधिक लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणकडून टीओडी मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरू असून, यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरत आहे.


Protected Content

Play sound