यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दहिगाव (ता. यावल) येथे नुकत्याच घडलेल्या तरुण इम्रान पटेलच्या निर्घृण खुनानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि न्याय मिळविण्यासाठी एकता संघटना व अन्य सामाजिक संघटनांनी जोरदार आवाज उठविला आहे. या खुनाची चौकशी विशेष समितीमार्फत एक महिन्यात व्हावी, अशी मागणी या संघटनांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे केली आहे.

इम्रान पटेल या युवकाचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला असून, खुनानंतर आरोपी ज्ञानेश्वर गजानन पाटील आणि गजानन रवींद्र कोळी हे दोघे स्वतःहून यावल पोलीस ठाण्यात हजर झाले आणि अटक करून घेतली गेली. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा एकता संघटना व इतर प्रतिनिधींनी यावल येथे येऊन रुग्णालय व पोलीस ठाण्याला भेट दिली. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत न्याय मिळविण्यासाठी सखोल तपासाची मागणी केली.

यावल येथे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याशी झालेल्या चर्चेत फारूक शेख (जळगाव), कुर्बान शेख (फैजपूर), जावेद जनाब (मारुळ), अँड. अलीम खान (यावल) यांनी घटना आणि तपासातील उणिवा स्पष्ट केल्या. डॉ. रेड्डी यांनी घटनास्थळाचा आणि तपासाचा सखोल आढावा घेत तातडीने आणि निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले. त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा होईल आणि या खुनाच्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण केला जाईल, असेही सांगितले.
घटनेची गंभीरता लक्षात घेता करीम सालार, एकता संघटनेचे फारूक शेख, राष्ट्रवादी पक्षाचे नदीम मलिक, कौमी एकटाचे कुरबान शेख, हुफ्फाझ फाउंडेशनचे रहीम पटेल, नोबल न्यूजचे मतीन पटेल, सामाजिक कार्यकर्ते अनिस शाह, एस.डी.पी.आय.चे मौलाना कासिम नदवी, अजित पवार राष्ट्रवादी गटाचे कासिम उमर, अयाजअली सय्यद, खालिद बागवान, इरफान सालार, जिया बागवान, इम्रान शेख, हाजी युसुफ, देशमुख आदींनी या प्रकरणाची चौकशी जिल्हास्तरीय विशेष समितीकडून एका महिन्यात करण्यात यावी, अशी अधिकृत मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर दहिगाव येथे निघालेल्या अंतिम यात्रेत हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी जळगाव शहर व तालुक्यातील विविध भागांतून लोकांनी उपस्थित राहून इम्रान पटेलला श्रद्धांजली अर्पण केली. घटनास्थळी जमावाचा संताप व्यक्त झाला, परंतु एकता संघटनेचे फारूक शेख, अनिस शाह, मतीन पटेल, कुर्बान शेख, जावेद जनाब, अँड. अलीम खान यांनी संयम राखून जमावाचे समाधान करत शांतता राखण्याचे आवाहन केले.



