रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीच्या प्रकरणावर महसूल विभागाने अखेर कठोर पावले उचलली असून, शुक्रवारी करण्यात आलेल्या धडक कारवाईत दोन ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे या कारवाईचे नेतृत्व महिला मंडळ अधिकारी सौ. सुषमा घरडे यांनी केल्यामुळे त्यांच्या धाडसाचे आणि कार्यतत्परतेचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईनंतर वाळू तस्करांच्या गटात खळबळ उडाली आहे.
तहसीलदार बंडू कापसे आणि निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत रावेर-पाल रस्त्यावर मुंजलवाडी परिसरात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, मंडळ अधिकारी सौ. घरडे यांनी तत्काळ पथकासह कारवाईसाठी धाव घेतली. त्यांच्या पथकात ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील परदेशी, नफीसा तडवी, कमलाकर हटकर (मुंजलवाडी), कैलास चव्हाण (उटखेडा) व कोतवाल गणेश चौधरी यांचा समावेश होता. त्यांनी संयुक्त कारवाई करत दोन ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केल्या व त्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या.

महिला अधिकाऱ्याच्या पुढाकारामुळे या कारवाईस विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, प्रशासनात महिलांचा सहभाग किती निर्णायक ठरू शकतो, याचे हे उदाहरण ठरले आहे. या कारवाईमुळे काही काळासाठी का होईना, पण वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तथापि, तालुक्यातील निंभोरासिम परिसरात मात्र ग्राम महसूल अधिकारी व संबंधित यंत्रणांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, दररोज रात्री शेकडो ब्रास वाळू डंपरद्वारे अवैधरीत्या वाहतूक केली जाते, पण याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे प्रशासनाने केवळ निवडक कारवाया न करता, सर्वच भागांत तितक्याच कठोरतेने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.



