पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, “अत्याचार करणाऱ्या आरोपीस फासावर लटकवा” या एकमुखी मागणीसह सकल हिंदू समाज आणि विविध संघटनांनी शहरात भव्य शांततामुक मोर्चा काढला. या निषेध मोर्चाला सर्व स्तरांतील नागरिक, राजकीय व सामाजिक नेते, विद्यार्थिनी आणि स्थानिक जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला.
ही निंदनीय घटना दिनांक २० ऑगस्ट रोजी घडली होती. पीडित मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी, त्याला कठोर शिक्षा मिळावी यासाठी समाजातून आवाज उठवला जात आहे. विशेषतः या गुन्ह्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी, पीडितेला त्वरीत न्याय मिळावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आरोपीवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुक मोर्चाची सुरुवात सकाळी १० वाजता पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथून झाली. पुढे हा मोर्चा आठवडे बाजार, रथ गल्ली, सराफ बाजार, गांधी चौक, जामनेर रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला. संपूर्ण मार्गावर सामील नागरिकांनी “अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या”, “बेटी बचाओ” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यामध्ये शहरातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आपली भूमिका मांडली. यावेळी आमदार किशोर पाटील, भाजप नेत्या वैशाली सूर्यवंशी, माजी गटनेते संजय वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष गोविंद शेलार, डॉ. निळकंठ पाटील, विकास लोहार, भूषण वाघ आदी उपस्थित होते.
गुरु गोरक्षनाथ आखाड्याचे योगीदत्तनाथ महाराज यांनी आक्रमक भाषण करत या प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा यापुढे मुक मोर्चे निघणार नाहीत, तर हातात शिंगाडे घेऊन आंदोलन केले जाईल, असा तीव्र इशारा दिला. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली.
यानंतर पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार आणि निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात आरोपीविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, पीडित कुटुंबाला शासकीय मदत व सुरक्षा द्यावी, गावोगावी मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात आणि अशा विकृत प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर निर्णय घ्यावेत, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली.



