अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था असलेल्या जिल्हा महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढीवर प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील प्रा. किरण अशोक पाटील यांची तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यकारी मंडळाने सर्वानुमते निवड केली आहे. त्यांच्या या निवडीचे शैक्षणिक व सहकारी क्षेत्रात सर्वत्र स्वागत होत असून, या नियुक्तीमुळे संस्थेच्या कामकाजात व्यावसायिकता व नवनवीन उपक्रमांची भर पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सन १९८७ साली स्थापन झालेल्या या पतसंस्थेच्या सदस्यांमध्ये जिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे. पतसंस्थेने शिक्षण क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी सदैव कार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या कार्यकारी मंडळाने एकमताने प्रा. किरण पाटील यांची तज्ज्ञ संचालक म्हणून निवड केली. त्यांच्या अनुभव, नेतृत्वक्षमता आणि सहकारी चळवळीतील सक्रिय सहभागाचा विचार करून ही निवड करण्यात आली आहे.

या निवडीप्रसंगी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक प्राचार्य डॉ. अनिल पाटील, चेअरमन प्रा. डॉ. राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रा. डॉ. विजय सोनजे, भालोद कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे, प्रा. डॉ. किशोर पाटील, प्रा. सुरेश अत्तरदे, प्रा. डॉ. अतुल देशमुख, प्रा. डॉ. शैलेशकुमार वाघ, प्रा. डॉ. संजीव साळवे, प्रा. डॉ. सौ. सुनिता चौधरी, प्रा. डॉ. स्वाती शेलार, प्रा. राजेश पाटील, प्रा. डॉ. प्रशांत पाटील, सुभाष वाघ, संजय इंगळे, प्रसाद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी प्रा. किरण पाटील यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या नियुक्तीमुळे सहकार चळवळीत एक नवा उत्साह संचारला आहे. प्रा. किरण पाटील यांची सहकारी संस्थांमध्ये कार्याची समृद्ध पार्श्वभूमी असून, ते सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यामुळे पतसंस्थेच्या कार्यक्षमतेत व निर्णयप्रक्रियेत गुणवत्ता वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



