Home क्राईम ब्रेकींग : आईसमोरच चिमुकलीचा अपघाती मृत्यू; रूग्णालयात आक्रोश !

ब्रेकींग : आईसमोरच चिमुकलीचा अपघाती मृत्यू; रूग्णालयात आक्रोश !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण भागात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. ममता हॉस्पिटलजवळ खेळत असलेल्या ६ वर्षीय मनीषा देवसिंग बारेला या चिमुकलीला भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मनीषाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

आई बांधकाम मजुरी करते
मनीषाचे कुटुंब मूळचे चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथील असून, ते सध्या जळगावातील मेहरूण येथे वास्तव्यास आहेत. मनीषाची आई स्थानिक ठेकेदार अहमद खान यांच्याकडे बांधकाम मजूर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. मनीषा ही पहिलीच्या वर्गात शिकत होती. अपघाताच्या वेळी तिची आई बांधकाम साईटवर काम करत होती, तर मनीषा तिच्या जवळच खेळत होती. अचानक ती रस्त्याजवळ गेली आणि भरधाव रिक्षाने तिला धडक दिली. धडकेमुळे तिच्या तोंडाला आणि पायाला जबर मार लागला.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अपघातानंतर ठेकेदार अहमद खान यांनी तातडीने नागरिकांच्या मदतीने मनीषाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयात आईचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. मनीषाच्या वडिलांचाही पाच वर्षांपूर्वी बस अपघातात मृत्यू झाला होता, त्यामुळे या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Protected Content

Play sound