
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाद्वारे नोंदणीकृत कामगारांना दिल्या जाणाऱ्या मोफत भांडी वाटप योजनेत दलालांचा हस्तक्षेप वाढल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. याला कंटाळून शेकडो गरजू महिलांनी यावल शहराच्या रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. भुसावळ टी-पॉइंटवर केलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे जवळपास एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने करावी, अशी प्रमुख मागणी या महिलांनी केली.

प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्यामुळे अनेक महिलांना अडचणी येत आहेत. याचा फायदा घेत स्वार्थी दलाल यात हस्तक्षेप करत असून, गरजू कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी प्रशासनाच्या भोंगळ कामकाजाविरोधात आवाज उठवला. महिला कार्यकर्त्या चंद्रकला इंगळे यांनी महिलांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या.
माजी नगराध्यक्ष मदतीला
आंदोलनाची माहिती मिळताच यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलन करणाऱ्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यामुळे आंदोलक महिलांना मोठा दिलासा मिळाला. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून भांडी वाटप योजना ऑफलाइन पद्धतीने सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.



