Home Uncategorized भादलीत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते दोन सामाजिक सभागृहांचे लोकार्पण

भादलीत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते दोन सामाजिक सभागृहांचे लोकार्पण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे कुंभार आणि कोळी समाजासाठी प्रत्येकी २०-२० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दोन सामाजिक सभागृहांचे लोकार्पण पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलताना पाटील यांनी समाजाच्या विकासासाठी सभागृहांचे महत्त्व अधोरेखित केले.

गुलाबराव पाटील म्हणाले, “भादली परिसरात अनेक विकासकामे सुरू आहेत आणि त्यातील बरीचशी कामे आता पूर्ण झाली आहेत. मतदारसंघातील जिथे जिथे मागणी झाली, तिथे तिथे सामाजिक सभागृहे मंजूर करून त्यांची कामे पूर्ण केली आहेत. समाजाच्या प्रगतीसाठी आणि एकोप्यासाठी सामाजिक सभागृह हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरते. कुंभार आणि कोळी समाज हा श्रमप्रिय आणि कष्टाळू समाज आहे. आज त्यांच्या हक्काच्या सभागृहांचे लोकार्पण होत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे.”

या सभागृहांना ‘समाजाचा अभिमान आणि आत्मसन्मान’ असे संबोधत पाटील पुढे म्हणाले, “या ठिकाणांहून समाज एकत्र येईल आणि पुढच्या पिढ्यांना योग्य दिशा मिळेल. शेतीसोबतच पशुपालन हा ग्रामीण जीवनाचा कणा असल्याने, भविष्यात पशुसंवर्धन दवाखान्यासाठीही मी प्रयत्नशील राहीन.”

कार्यक्रमात ग्रामपंचायत विकास सोसायटी व दोन्ही समाजाच्या वतीने गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच मनोज चौधरी, उपसरपंच सुनील पाटील, हितेश नारखेडे, संदीप कोळी, तसेच परिसरातील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेश नारखेडे यांनी केले, तर आभार विकास सोसायटीचे उपाध्यक्ष संदीप कोळी यांनी मानले. या दोन्ही सभागृहांमुळे समाजाला सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.


Protected Content

Play sound