मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा चर्चेच्या झोतात आला आहे, मात्र यावेळी कारण आहे त्याचं वैवाहिक आयुष्य. तीन दशकांहून अधिक काळापासून गोविंदासोबत संसार करत असलेल्या सुनीता आहूजांनी अखेर बांद्रा फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गोविंदाचे एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीबरोबरचे अफेअर समोर आले असून, हेच या विभक्ततेचे मुख्य कारण असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता यांनी हिंदू विवाह अधिनियम 1955 च्या कलम 13 (1) (i), (ia), आणि (ib) अंतर्गत घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. यामध्ये त्यांनी व्यभिचार, क्रूरता आणि परित्यागाचे आरोप केले असून, गोविंदाच्या एका तरुण मराठी अभिनेत्रीशी वाढलेल्या जवळीकीमुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात निर्माण झालेल्या दरीचा उल्लेखही करण्यात आला आहे. कोर्टात दाखल याचिकेनुसार, सुनीता यांनी या संबंधामुळे स्वतःला मानसिक आणि भावनिक त्रास झाल्याचे स्पष्ट केले आहे.

बांद्रा फॅमिली कोर्टाने याप्रकरणी गोविंदाला 25 मे रोजी समन्स जारी केले होते. मात्र, अद्याप अभिनेता कोर्टात हजर झाला नसल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीसही जारी केली आहे. दुसरीकडे, सुनीता मात्र जून 2025 पासून नियमितपणे कोर्टात हजर राहून कार्यवाहीत भाग घेत आहेत. त्यामुळे ही केस लवकरच निर्णायक वळणावर पोहोचू शकते.
गोविंदाची एकूण संपत्ती सध्या ₹150 ते ₹170 कोटींच्या घरात असल्याचे अंदाज आहेत. जूहूमधील ‘जलदर्शन’ बंगल्याची किंमत एकटीच ₹16 कोटींपेक्षा अधिक आहे. त्याचबरोबर मुंबई, कोलकाता, रायगड आणि लखनऊमधील मालमत्ताही त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे सुनीता यांना पोटगीच्या स्वरूपात किती रक्कम मिळणार, यावरही सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय कायद्यानुसार पोटगीसाठी निश्चित रक्कम नसली तरी पतीच्या उत्पन्नाच्या 25 टक्क्यांपर्यंत रक्कम पत्नीला मिळू शकते. विशेषतः जर पत्नीची स्वतःची कमाई मर्यादित असेल आणि विवाहाचा कालावधी बराच मोठा असेल (गोविंदा आणि सुनीता यांचा विवाह 1987 पासून आहे), तर पोटगीची रक्कम वाढू शकते. कायदेतज्ज्ञांच्या मते, गोविंदाला सुनीताला अंदाजे ₹35 ते ₹40 कोटी रुपयांपर्यंत रक्कम द्यावी लागू शकते.
सुनीता आहूजांनी घटस्फोटासाठी दाखल केलेली याचिका मुख्यत्वे तीन आधारांवर आधारित आहे – व्यभिचार, क्रूरता आणि परित्याग. यामध्ये त्यांनी गोविंदाने विवाहबाह्य संबंध ठेवले, मानसिक आणि भावनिक छळ केला, तसेच वैध कारण नसताना त्यांच्या वैवाहिक आयुष्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप लावला आहे. गोविंदाकडून अजूनही कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नसल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.



