भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गांजाची तस्करी करणाऱ्या एका संशयिताला रंगेहात पकडले आहे. त्याच्याकडून सुमारे २ लाख ९० हजार रुपये किमतीचा गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहिती आणि यशस्वी सापळा
शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गोपाळ गव्हाळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक व्यक्ती काळसर रंगाच्या मोटारसायकलवरून भुसावळ शहरात गांजाची बेकायदेशीर वाहतूक करत आहे. ही माहिती त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवली. त्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.

आरोपीला शिताफीने पकडले
पोलीस पथकाने हॉटेल सुरुची इनसमोरील राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एक इसम होन्डा शाईन मोटारसायकलवर संशयास्पदपणे येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून जाऊ लागला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अनारसिंग वालसिंग भिलाला (वय ३०, रा. शमलकोट, मध्य प्रदेश) असे सांगितले.
गुन्हा दाखल: पुढील तपास सुरू
आरोपीकडून १० किलो २७५ ग्रॅम वजनाचा गांजा, एक मोटारसायकल आणि मोबाईल हॅंडसेट असा एकूण २ लाख ९० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल विकास सातदिवे यांच्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



