जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमध्ये असलेल्या हॉटेल तारा येथे कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जळगाव पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (एएचटीयू) मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी रात्री पोलिसांनी अत्यंत धाडसी आणि गोपनीय पद्धतीने या हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बनावट ग्राहक, अचूक सापळा: देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश
एएचटीयू पथकाने मिळालेल्या माहितीनुसार, सापळा रचून कारवाईची योजना आखली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवले. ठरल्याप्रमाणे सिग्नल मिळताच, पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यातून तीन महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी दोन महिला बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी हॉटेल मालक योगेश देवरे यांच्यासह राज तायडे आणि मंगेश सोमवंशी यांना ताब्यात घेतले आहे.

संशयास्पद आधारकार्ड: बांगलादेशी कनेक्शन उघड
सुटका करण्यात आलेल्या महिलांकडे कोल्हापूर पत्त्याचे आधारकार्ड आढळले, ज्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. चौकशीदरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, त्यांना मराठी किंवा हिंदी भाषा बोलता येत नव्हती, इतकेच नव्हे तर भारताचे राष्ट्रगीतही त्यांना म्हणता आले नाही. यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
पोलीस अधीक्षकांकडून माहितीची पुष्टी: बांगलादेशी असल्याचा कबुलीजबाब
पोलिसांनी महिलांची कसून चौकशी केली असता, या तीन महिलांपैकी दोन महिलांनी आपण बांगलादेशी असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. या कबुलीजबाबामुळे या कुंटणखान्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.



