रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय विवाहित महिलेला ब्लॅकमेल करत विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. “तुझे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवतो” अशी धमकी देत पीडित महिलेचा छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रावेर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावात राहते. संबंधित आरोपी किशोर नावाच्या व्यक्तीने तिचे खाजगी फोटो पतीला दाखवण्याची धमकी देत विनयभंग केला. या धमकीमुळे मानसिक त्रास झालेल्या महिलेने अखेर धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

महिलेच्या फिर्यादीवरून किशोर नामक आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील हे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे स्थानिक महिला संघटनांचे म्हणणे आहे. पीडितेला न्याय मिळावा यासाठी गावातील नागरिकांकडून एकजूट दाखवली जात असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणीही केली जात आहे.



