Home Cities जळगाव हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडले; तापी नदीत १.२४ लाख क्युसेक विसर्ग

हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडले; तापी नदीत १.२४ लाख क्युसेक विसर्ग


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हतनूर धरणातून ३५१७ क्युमेक्स (१ लाख २४ हजार २०३ क्युसेक) इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यासाठी धरणाचे एकूण २० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असल्याची माहिती जळगाव पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी दिली.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आल्याने तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर, नदीकाठच्या गावांमध्ये कोणतीही पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले असून, संबंधित प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांना नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता बाळगण्याबाबत आणि आवश्यक उपाययोजना करण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकाठी जाऊ नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound