Home उद्योग जागतिक छायाचित्र दिन जैन इरिगेशनमध्ये उत्साहात साजरा

जागतिक छायाचित्र दिन जैन इरिगेशनमध्ये उत्साहात साजरा


 जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावमधील जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या जैन हिल्स मुख्यालयात जागतिक छायाचित्र दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात कॅमेऱ्यांचे पूजन करून छायाचित्रकारांना सन्मानित करण्यात आले. छायाचित्रणाच्या कलेला समर्पित अशा या दिवसाचे औचित्य साधून जैन इरिगेशनच्या अध्यक्ष अशोक जैन यांनी सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या आणि संस्थेच्या कला व सर्जनशीलतेविषयीची बांधिलकी अधोरेखित केली.

या कार्यक्रमात जैन इरिगेशनच्या कला विभागाचे उपाध्यक्ष विकास मल्हारा यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित छायाचित्रकारांमध्ये राजेंद्र माळी, हिमांशू पटेल, योगेश संधानशिवे, जगदीश चावला, जितेंद्र झंवर, अनिल नाईक, सुनील दांडगे, महेश दांडगे, परेश बाविस्कर, प्रशांत शिंदे, आनंद पाटील, संजय तिवारी, आणि ज्ञानेश्वर शेंडे यांचा समावेश होता. उपस्थितांनी छायाचित्रणाच्या कलेच्या विविध पैलूंवर आपले अनुभव मांडले आणि जैन इरिगेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्याची परंपरा संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी सुरू केली होती. त्यांच्या हस्ते कॅमेऱ्यांचे पूजन करून जैन हिल्स येथे पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. त्या काळापासून जैन परिवाराने हा सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा जपला असून, दरवर्षी हा दिवस संस्थात्मक स्तरावर श्रद्धा, आदर आणि उत्साहाने साजरा केला जातो. कॅमेऱ्याला केवळ तांत्रिक साधन म्हणून न पाहता, अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम मानून त्याचा सन्मान करण्याची ही परंपरा आजही संस्थेमध्ये जपली जाते.

या उपक्रमातून छायाचित्रकारांच्या कार्याची आणि त्यांच्या योगदानाची जाणीव साऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होते. तसेच, संस्थेतील नव्या पिढीतील सदस्यांमध्येही छायाचित्रणाबद्दल आदर आणि प्रेरणा जागृत होते. जैन इरिगेशनने सुरू केलेली ही सांस्कृतिक चळवळ आज एका उदाहरणात्मक उपक्रमात परिवर्तित झाली आहे.


Protected Content

Play sound