जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शनीपेठ भागात महानगरपालिका शाळेसमोर गोगादेव महाराजांच्या मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या एका २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना रविवार, १७ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक २० वर्षीय तरुणी रविवार, १७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता महानगरपालिकेच्या शाळेसमोर सुरू असलेली गोगादेव महाराजांची मिरवणूक पाहण्यासाठी उभी होती. त्याचवेळी साहिल राजू जावळे (रा. जळगाव) या संशयित आरोपीने तरुणीकडे पाहून तिचा विनयभंग केला. साहिलने तरुणीला हाताने इशारा करून ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने तरुणीकडे तिचा मोबाईल नंबर मागितला, तसेच तिला फोन करण्यासाठीही इशारा केला, ज्यामुळे तरुणीला अत्यंत वाईट अनुभव आला.

हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने तात्काळ जवळच्या शनीपेठ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलिसांनी संशयित आरोपी साहिल राजू जावळे याच्या विरोधात सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल युवराज कोडी करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



