रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहर आणि परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे नागझिरी नदीला पूर आला असून, यामुळे अजंदे गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
रात्री तीन वाजल्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील नाले आणि गटारे तुंबली आहेत. यामुळे रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत होते, ज्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. बक्षीपूर, रमजीपूर आणि सिंदखेडा या गावांनाही पावसाचा मोठा फटका बसला असून, काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे.

शहरातील जुन्या नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना पाणी उपसण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे लागत आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पूरस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.



