पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आता वादळी वाऱ्यासह आलेल्या अति मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. १५ ऑगस्टच्या रात्रीपासून १६ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत पडलेल्या या पावसाने कापूस आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक शेतांमध्ये कापूस आणि मका पिके वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे आडवी पडली आहेत. कापसाच्या फुलपांद्या तुटल्या असून, त्या आडव्या झाल्या आहेत. विशेषतः, नदी-नाले आणि शेतरस्त्यांचे पाणी शेतात शिरल्याने कापसाचे पीक पिवळे पडून ते खराब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उभ्या पिकांचे असे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी स्वर्गीय शरद जोशी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील आणि तालुकाध्यक्ष प्रा. भिकनराव पाटील यांनी केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर द्यावी, असे आवाहन त्यांनी प्रशासनाकडे केले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या या नुकसानीची गंभीर दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



