Home Cities यावल  जिल्ह्यात केळी टिशू कल्चर उत्पादन केंद्र उभारणीस गती ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई...

 जिल्ह्यात केळी टिशू कल्चर उत्पादन केंद्र उभारणीस गती ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचेकडून प्रस्तावित जागेची पाहणी


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावल तालुक्यातील हिंगोणा बु. येथे उभारण्यात येणाऱ्या केळी टिशू कल्चर रोपे उत्पादन केंद्रासाठी प्रस्तावित जागेची पाहणी आज केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केली. या केंद्राच्या उभारणीने जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील केळी उत्पादन क्षेत्राला नवे बळ मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडमार्फत उभारण्यात येणारे हे आधुनिक केंद्र शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. या केंद्रामार्फत रोगमुक्त, उच्च दर्जाची आणि परवडणाऱ्या दरातील टिशू कल्चर केळी रोपे शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे उत्पादन वाढीस चालना मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नही वाढणार आहे.

हिंगोणा हे केंद्रासाठी आदर्श ठिकाण ठरले असून, या भागातील खोल काळी सुपीक माती, भरपूर पाण्याची उपलब्धता आणि केळी उत्पादन पट्ट्याच्या मध्यवर्ती असलेले स्थान यामुळे या जागेची निवड करण्यात आली आहे. या प्रस्तावित योजनेला केंद्र आणि राज्य शासनाचेही भक्कम पाठबळ लाभत आहे.

या केंद्राच्या उभारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे रक्षाताई खडसे यांनी यावेळी नमूद केले. त्यांनी या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

या केंद्राच्या स्थापनेमुळे केळी उत्पादनात आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्याची ‘बनाना कॅपिटल’ म्हणून असलेली ओळख अधिक बळकट होईल, असा विश्वास रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound