जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या जळगाव जिल्हा दौऱ्यादरम्यान, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा सखोल आढावा रविवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शिवकॉलनी येथील पक्ष कार्यालयात घेतला. जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आयोजित या महत्त्वाच्या बैठकीला खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आढावा बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल पाटील, गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. अजित पवार यांनी प्रत्येक जिल्ह्यातील पक्षवाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी संघटना अधिक मजबूत करण्यावर आणि जनतेशी संवाद वाढवण्यावर भर दिला.

या बैठकीमुळे खान्देशातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक सक्रिय होण्याचे आवाहन त्यांनी केले. अजित पवारांच्या या दौऱ्यामुळे धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील पक्षाला नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



