जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मेहतर वाल्मिकी समाजाचे आराध्य दैवत श्री जाहरवीर गोगादेव चौहान आणि श्री रत्नावीर जी चांवरिया महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी १७ ऑगस्ट रोजी जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शनिपेठ येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, त्यात आकर्षक देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. तसेच, महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मेहतर वाल्मिकी समाज मोठ्या उत्साहात आपल्या दैवतांची जयंती साजरी करणार आहे. उद्या सकाळी शनिपेठ परिसरातील गोगादेव मंदिरातून मिरवणुकीला प्रारंभ होईल. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून पुन्हा शनिपेठेत समारोप करेल. मिरवणुकीमध्ये समाजातील बांधवांचा मोठा सहभाग अपेक्षित असून, पारंपरिक वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघणार आहे.

या सोहळ्यात विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमामुळे समाजात एकोपा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आयोजक सूरज पवार यांनी व्यक्त केली.



