जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आंबीलहोळ देवी येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यंदाच्या ध्वजारोहणाचा मान गावातील गुणवंत विद्यार्थिनीला देण्यात आला होता, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात दहावी परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या चंचल भानुदास चव्हाण हिने सुमित विलास पवार याच्या सहकार्याने ध्वजारोहण केले.

या उपक्रमामागचा हेतू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा असून, जिल्हा परिषद शाळेत दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्तेच ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू आहे. यंदाच्या वर्षी दहावीमध्ये ९१ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावलेल्या चंचल चव्हाण हिला या गौरवासाठी निवडण्यात आले. तिच्यासोबत सुमित विलास पवार याने देखील ध्वजारोहणात सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जिद्द वाढवण्यास मदत होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या वेळी विविध सांस्कृतिक आणि देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली, नृत्य, भाषणं, आणि कविता वाचन यामुळे उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला. गावातील नागरिक, पालक, आणि सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी सरपंच डाळिंबाई चव्हाण, उपसरपंच देविदास चव्हाण, दौलत पवार, ग्यानदास चव्हाण, भानुदास चव्हाण, विकास पवार, नटवर चव्हाण, किसन राठोड, अंगूर चव्हाण, आसाराम चव्हाण, रामदास चव्हाण, विजय चव्हाण, सुदाम पवार, बाळू चव्हाण यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय जाधव, मुख्याध्यापक आशा पडार, तसेच शिक्षकवर्ग, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामस्थांचा मोठा सहभाग कार्यक्रमात दिसून आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना फक्त गुणांच्या आधारेच नव्हे तर सामाजिक सन्मानही मिळू शकतो, हा संदेश मिळाल्याने गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील वर्षी अधिक विद्यार्थ्यांनी अशा सन्मानासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ आणि शिक्षकांनी व्यक्त केली.



