धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरात शुक्रवारी रात्री ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे धरणीनाल्याला अचानक पूर आला आणि त्यामुळे बाजारपेठेतील अनेक दुकाने पाण्याखाली गेली. या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदतीची मागणी जोर धरू लागली आहे.

शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाचे प्रमाण एवढे वाढले की धरणीनाल्याला ओसंडून वाहणारा पूर आला. या पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की नाल्यालगत असलेली दुकाने काही क्षणांतच पाण्याखाली गेली. नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. विशेषतः किराणा दुकान, मोबाईल शॉप्स, हॉटेल्स आणि लहान उद्योगांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

अनेक दुकानांमध्ये पाणी साचल्यामुळे किराणा माल भिजून खराब झाला, तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना देखील मोठा फटका बसला. काही ठिकाणी तर दुकानांचे फर्निचर आणि इतर साहित्य पूर्णतः नष्ट झाले. व्यापाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, परंतु पावसाच्या जोरामुळे बचाव करणे अशक्य झाले.
शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी स्थानिक प्रशासनाला तातडीने पंचनामे करून मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांची माहिती घेतली आणि घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची नोंद केली.
या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. “आमचं संपूर्ण वर्षाचं भांडवल पाण्यात गेलंय, शासनाने आमचं ऐकावं,” अशी भावना अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. नागरिकांकडून देखील प्रशासनाने तात्काळ मदतीचे पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
ही घटना भविष्यात अशा संकटांना तोंड देण्यासाठी प्रशासनाने योग्य पूर्वतयारी ठेवावी, अशी अपेक्षा देखील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.



