Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये एक किमी लांबीच्या तिरंगा रॅलीने जागवली देशभक्ती 

अमळनेरमध्ये एक किमी लांबीच्या तिरंगा रॅलीने जागवली देशभक्ती 


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अमळनेर शहरात देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला. नगरपरिषद आणि खासदार स्मिता वाघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून ते तिरंगा चौकापर्यंत तब्बल एक किलोमीटर लांबीच्या तिरंगा झेंड्याची भव्य रॅली काढण्यात आली. देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेल्या या रॅलीमध्ये सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

सकाळी ९ वाजता खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे पूजन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले आणि त्यानंतर या रॅलीस उत्साहात सुरुवात झाली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी तुषार नेरकर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. रॅलीने मंगलमूर्ती चौक, महाराणा प्रताप चौक, बसस्थानक, पाचपावली चौक मार्गे तिरंगा चौक गाठला. तिरंगा चौकात पोहोचताना या एक किमी लांबीच्या तिरंग्याने संपूर्ण चौकाला वेढा दिला आणि वातावरण पूर्णतः तिरंगामय झाले.

या रॅलीदरम्यान ‘माझी वसुंधरा’ सामूहिक शपथ घेण्यात आली आणि त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायले गेले. परिसर देशभक्तिपर गीते आणि घोषणांनी भारून गेला होता. रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर राष्ट्रप्रेमाची ज्वाळा स्पष्टपणे दिसत होती. खासदार स्मिता वाघ यांनी या रॅलीला संबोधित करताना विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले आणि सांगितले की, “आजची ही रॅली अमळनेरच्या नागरिकांमध्ये देशभक्ती जागवणारी ठरली आहे. देश अधिक बळकट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.”

रॅलीमध्ये नगरपालिका कर्मचारी, आशा स्वयंसेविका, विविध शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जी.एस. हायस्कूल, मुंदडा ग्लोबल स्कूल, आर्मी स्कूलच्या एनसीसी विद्यार्थ्यांपासून ते खान्देश सुरक्षा रक्षक संघटनेचे सदस्य, महिला मंच पदाधिकारी यांचा सहभाग लक्षणीय ठरला.

धनदायी महाविद्यालय, जययोगेश्वर माध्यमिक विद्यालय, प्रताप महाविद्यालय, भगिनी मंडळ शाळा, सानेगुरुजी कन्या शाळा, लोकमान्य शाळा, डी.आर. कन्या शाळा, स्वामी विवेकानंद शाळा, नवीन मराठी शाळा यांचे शिक्षक, विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ट्रॅक्टरवर सादर करण्यात आलेल्या विविध वेशभूषा आणि सानेगुरुजी कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी देशासाठी योगदान दिलेल्या महिलांची उभारलेली झांकी.

रॅलीच्या पुढे अग्निशमन दलाच्या सजवलेल्या गाड्या, मोटारसायकली, विद्यार्थी वेशभूषांमध्ये सजलेले होते. रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागरिकही ही रॅली पाहून भारावून गेले. या उपक्रमात लायन्स क्लब, निरज अग्रवाल व नगरपालिका यांच्याकडून बिस्किट, चॉकलेट आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सूत्रसंचालन संजय पाटील आणि अभियंता डिगंबर वाघ यांनी केले, तर आभारप्रदर्शन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी मानले.


Protected Content

Play sound