Home Cities धरणगाव बालकवींच्या १३५व्या जयंतीनिमित्त साहित्यिक वारशाला नवी दिशा 

बालकवींच्या १३५व्या जयंतीनिमित्त साहित्यिक वारशाला नवी दिशा 


धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  येथील साहित्य कला मंचतर्फे विख्यात कवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी बालकवींच्या स्मृतींना उजाळा देताना, त्यांच्या नावाने उभारल्या जात असलेल्या स्मारकाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि साहित्य क्षेत्रात नवसंजीवनी देणाऱ्या उपक्रमांची रूपरेषा आखण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात बालकवींच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत साहित्याच्या नव्या वाटा शोधण्याचा संकल्प केला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी यांनी बालकवींच्या समृद्ध साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकत स्मारकासाठी झालेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. माजी मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठबळामुळे स्मारकाच्या कामास गती मिळाल्याचे सांगत, त्यांचे संस्थेच्यावतीने आभार मानण्यात आले.

सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी सध्याच्या समाजात साहित्यिकांच्या योगदानाकडे होणाऱ्या दुर्लक्षाबद्दल खंत व्यक्त केली. स्मारक हे केवळ भौतिक नव्हे तर साहित्यिक संस्कृतीचा केंद्रबिंदू ठरेल, असे मत त्यांनी मांडले. कार्याध्यक्ष डी. एस. पाटील यांनी स्मारक परिसरात वृक्ष लागवड करण्याच्या कल्पनेचा प्रस्ताव मांडला. डॉ. बापू शिरसाठ यांनी बालकवींच्या “औदुंबर” आणि “श्रावणमास” या कवितांचे रसग्रहण करत भावनिक वातावरण निर्मिती केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक वं. दे. लोहार होते. त्यांनी साहित्य कला मंचच्या ३५ वर्षांच्या सृजनशील वाटचालीचे स्मारक हे फलित असल्याचे गौरवोद्गार काढले. होणाऱ्या स्मारकात बालकवींची प्रतिमा, खुले प्रेक्षागृह, कलादालन, सभागृह व वाचनालय यांचा समावेश असून सर्व सदस्यांनी त्याचे स्वागत केले. आगामी नियोजनात भव्य लोकार्पण सोहळा, खान्देशस्तरीय साहित्य संमेलन, कथा-कवितेच्या कार्यशाळा, स्थानिक कवी संमेलनबालकवी पुरस्कारांचे वितरण यांचा समावेश करण्यात येणार आहे.

राहूल जैन यांनी सूत्रसंचालन तर कैलास पवार यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला मुकेश तिवारी, विवेक लाड, श्रेयान्स जैन, सुधाकर विसावे, सखाराम माळी, आणि भोजराज चौधरी यांसह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते.


Protected Content

Play sound