अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवयवदान हे जीवनदानाचा अनमोल मंत्र आहे, हा संदेश समाजात रुजवण्यासाठी लायन्स क्लब ऑफ अमळनेरने जागतिक अवयवदान दिनानिमित्त (१३ ऑगस्ट) विशेष जनजागृती मोहीम राबवली. नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर येथे सकाळी ९ वाजता झालेल्या या कार्यक्रमात अवयवदान जनजागृती पोस्टरचे उद्घाटन व वितरण करण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मुंडावरे यांनी “अवयव स्वर्गात नेऊ नका, त्यांची गरज इथेच आहे” हा संदेश देत अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी अवयवदानामुळे अनेक गरजू व्यक्तींना नवीन जीवन कसे मिळू शकते, यावर प्रकाश टाकला.

“अवयवदान – जीवनाची देणगी” हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. पोस्टर अनावरण प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, मयुरी जोशी, डॉ. युसूफ पटेल, निरज अग्रवाल, प्रशांत सिंघवी, महावीर पहाडे, प्रितम मणियार, राजेश कुंदनानी, रोनक दोडीवाला यांच्यासह अनेक लायन्स सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर अमळनेर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये अवयवदान जनजागृती पोस्टरचे वाटप करण्यात आले. लायन्स क्लब सदस्य आणि नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. या मोहिमेतून अनेक नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा करून समाजासाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यामुळे या जनजागृती मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.



