जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे २१ वर्षीय सुलेमान रहीम खान पठाण या तरुणावर झालेल्या अमानुष सामूहिक मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेचा जळगाव जिल्हा एकता संघटनेने तीव्र निषेध व्यक्त करत, दोषींवर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी १२ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
या निवेदनात एकता संघटनेने घटनेच्या स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशीसाठी विशेष तपास पथक (S.I.T.) स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषींवर तात्काळ कडक कारवाई करून भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याची मागणी करण्यात आली. पीडित कुटुंबाला किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

या प्रकरणात मानवाधिकार आयोग आणि अल्पसंख्याक आयोगाने स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. बेटावद खुर्द गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
एकता संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, जर दोषींवर त्वरित कारवाई झाली नाही आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना अशोक लाडवांजरी आणि अपर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना मतीन पटेल यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले. अल्पसंख्याक आयोग, मानवाधिकार आयोग आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही प्रशासनामार्फत तसेच थेट हे निवेदन पाठवण्यात आले आहे.
यावेळी जळगाव जिल्हा एकता संघटनचे अशोक लाड वंजारी, फारुक शेख, मुफ्ती खालिद, हाफिज रहीम पटेल, अनिस शाह, मतीन पटेल, मौलाना गुफरान, हाफिज इमरान काकर, जामनेरचे जावेद मुल्लाजी व आसिफ इस्माईल, रज्जाक पटेल, कासिम उमर, नजमोद्दीन शेख, आरिफ देशमुख, युसुफ खान व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



