भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक १४ (नवीन प्रभाग क्रमांक १५) मधील बोगस, मयत, स्थलांतरित आणि ग्रामीण मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी २०१६ पासून सुरू असलेल्या तक्रारींवर अखेर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे भुसावळच्या मतदार यादीतील घोळावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पटेल कॉलनी, मोहम्मद अली रोड येथील रहिवासी इल्यास इक्बाल मेमन यांनी १५ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रथमच निवडणूक विभागाकडे १,२५० हून अधिक बोगस आणि अपात्र मतदारांची यादी पुराव्यासह सादर केली होती. त्यानंतर गेली अनेक वर्षे त्यांनी तालुका आणि जिल्हा निवडणूक कार्यालयात वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या, परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

याबाबत मेमन यांनी नुकताच २८ जुलै रोजी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला. या तक्रारीची दखल घेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी उपविभागीय अधिकारी, भुसावळ आणि तहसीलदार, भुसावळ यांना नियमानुसार कार्यवाही करून तक्रारदारास कळवण्याचे, तसेच अहवाल जिल्हा निवडणूक कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मेमन यांच्या मते, २०२२ च्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही याच बोगस आणि अपात्र नावांचा समावेश कायम राहिला, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. “२०१६ पासून दिलेल्या पुराव्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे हे उल्लंघन लोकशाही प्रक्रियेस धक्का देणारे आहे,” असे मेमन यांनी म्हटले आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या या पत्रामुळे आता संबंधित विभागावर त्वरित आणि निष्पक्ष कारवाई करण्याची जबाबदारी आली आहे. या कारवाईमुळे भुसावळ नगरपालिकेच्या मतदार याद्या अधिक शुद्ध आणि पारदर्शक होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



