अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘मी दुसऱ्यांदा आमदार झालो असून, जिल्हा परिषद सदस्य ते मंत्रिपदाच्या प्रवासात कळमसरे गावाचा मोठा खारीचा वाटा आहे. माझ्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत कळमसरे गाव नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले आहे, कारण माझ्या राजकारणाची सुरुवातच २००२ साली कळमसरे गावातून झाली आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मला मोलाचे सहकार्य मिळाले,’ असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार अनिल पाटील यांनी कळमसरे (ता. अमळनेर) येथील वि.का. सहकारी सोसायटीच्या व्यापारी संकुल लोकार्पण प्रसंगी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पिरन पाटील, संचालक प्रा. सुभाष जिभाऊ पाटील, डॉ. अनिल शिंदे, समाधान धनगर, प्रफुल्ल पाटील, सचिन बाळू पाटील, विजू आप्पा, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, पाडळसरे येथील माजी सरपंच सचिन पाटील, भूषण पाटील, संजय पाटील, डांगरी सरपंच अनिल शिसोदे, सरपंच जगदीश निकम, जिल्हा बँकेचे विभागीय उपव्यवस्थापक अनिल अहिरराव, भाजपा पदाधिकारी राहुल पाटील, बोहरा येथील उत्तमराव पाटील, निम येथील डॉ. एल. डी. पाटील, जे. के. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार अनिल पाटील पुढे म्हणाले की, तालुक्यातील जनतेने दुसऱ्यांदा विश्वास ठेवून त्यांना आमदार केले आहे. शेत-शिवार व पाणंद रस्ते, शेत सिंचनासाठी पाडळसरे प्रकल्प, उपसा जलसिंचन योजना आणि सी.आर.एफ. फंडातून तालुक्यातील रस्ते या प्रमुख गरजा लवकरच पूर्णत्वास येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, कळमसरे वि.का. सोसायटीने व्यापारी गाळ्यांचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. अनिल दादा पहिल्याच टर्ममध्ये कॅबिनेट मंत्री झाल्याने त्यांच्या प्रयत्नांनी पाडळसरे धरणाला सुप्रमा मिळाली. नुकतेच पाडळसरे धरण प्रकल्प पी. एम. के. एस. वाय योजनेत समाविष्ट झाल्याने ८५९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. अमळनेर ते श्री. क्षेत्र कपिलेश्वर रस्ता व निम ते मांजरोद तापी नदीवरील पुलासाठी लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार अनिल दादा पाटील यांच्यासमवेत भेट घेणार असल्याचेही खासदार स्मिता वाघ यांनी नमूद केले.
यावेळी वि.का. सोसायटीचे चेअरमन, व्हॉइस चेअरमन आणि संचालक मंडळाने खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन देवेंद्र महाजन यांनी केले. यावेळी कळमसरेसह परिसरातील ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



