शेगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला वेगवान आणि आधुनिक रेल्वेसेवेने जोडणाऱ्या नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे आज भव्य उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवून या ऐतिहासिक गाडीला रवाना केलं. या उद्घाटनाचा भाग म्हणून वंदे भारत एक्सप्रेस आज दुपारी तीनच्या सुमारास शेगाव रेल्वे स्थानकावर पहिल्यांदाच दाखल झाली, आणि यावेळी नागरिकांनी उस्फूर्त जल्लोष करत ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.

नागपूरहून सुरू झालेला हा प्रवास सुमारे 880 किलोमीटरचा असून ही ट्रेन तो अवघ्या 12 तासांत पूर्ण करणार आहे. नागपूर ते पुणे हा मार्ग आता अधिक जलद आणि आरामदायक झाला असून, आठवड्यातून सहा दिवस ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. ही विदर्भातील नागपूर शहराला वंदे भारत सेवा मिळालेली पहिली ट्रेन ठरली आहे, आणि म्हणूनच तिचं महत्त्व विशेष आहे.

शेगावमध्ये या गाडीचं आगमन झाल्यावर रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी उसळली होती. स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या ऐतिहासिक क्षणासाठी उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी या संपूर्ण घटनाक्रमाचा थेट वृत्तांत शेगाव येथून दिला.
या वेळी काही विद्यार्थ्यांनीही प्रतिक्रिया देताना ही ट्रेन त्यांच्यासाठी कशी उपयुक्त ठरणार आहे, याबाबत आपली मतं मांडली. त्यामध्ये अभ्यासासाठी पुणे किंवा नागपूरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही ट्रेन वेळेची बचत करणारी आणि सुरक्षित असल्याचं सांगितलं. स्थानिक व्यापाऱ्यांनीही या सेवेमुळे व्यवसायिक दळणवळण अधिक सोयीचं होईल, असं नमूद केलं.
शेगाव हे संत गजानन महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने देखील या गाडीचा थांबा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुणे आणि नागपूरहून मोठ्या संख्येने भाविक शेगावला येतात, आणि आता त्यांच्यासाठी ही ट्रेन अधिक वेगवान व पर्याय ठरणार आहे.
या गाडीचे आगमन हे केवळ एका रेल्वे सेवेचे उद्घाटन नसून, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक नात्यांना बळकटी देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे.



