तिरुप्पूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक व्यापारात वादळ निर्माण केलं आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याचा मुद्दा पुढे करत त्यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट फटका आता भारतातील वस्त्र उद्योगावर बसू लागला आहे. तामिळनाडूतील तिरुप्पूर शहर, जे देशाच्या वस्त्र निर्यातीचा मोठा आधार आहे, तिथे अनेक उत्पादक कंपन्यांनी उत्पादनच थांबवलं आहे.

तिरुप्पूर येथील वस्त्र निर्यातदार कंपन्यांनी अमेरिकेकडून मिळणाऱ्या ऑर्डर्सवरील अंमलबजावणी तात्पुरती स्थगित केली आहे. अमेरिकन खरेदीदारांनी टॅरिफ वाढीच्या पार्श्वभूमीवर ‘वेट अँड वॉच’ म्हणजेच परिस्थितीचं निरीक्षण करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भारतातून कापड व वस्त्रांची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.

तिरुप्पूर एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष के.एम. सुब्रमण्यम यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, तिरुप्पूरमधून दरवर्षी सुमारे ४५,००० कोटी रुपयांची वस्त्र निर्यात केली जाते, यातील ३० टक्के म्हणजे सुमारे १२,००० कोटी रुपयांची निर्यात अमेरिकेत होते. ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयामुळे यातील ५० टक्के म्हणजेच सुमारे ६,००० कोटी रुपयांचा व्यवसाय थेट धोक्यात आला आहे.
सुब्रमण्यम यांनी यासोबतच खुलासा केला की, टॅरिफमुळे बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून काही कंपन्यांनी तात्काळ उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सर्व कंपन्या पुढील दोन आठवड्यांची वाट पाहत आहेत. त्यानंतरच पुढील पावले उचलली जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
याच दरम्यान भारत आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे काही कंपन्या यूके बाजारपेठेतील संधींचा विचार करत आहेत. मात्र अमेरिकन बाजारपेठेचा आकार आणि त्यातील स्थिरता पाहता, या निर्णयाचा परिणाम केवळ तिरुप्पूरच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या वस्त्र निर्यातीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून व्यापार धोरणात स्पष्टता आणावी, अशी मागणी उद्योग संघटनांकडून होत आहे. अन्यथा रोजगार, परकीय गुतवणूक आणि उत्पादन या सर्वच पातळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.



