
रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील जुन्या नाल्यावर झालेल्या बेकायदेशीर आरसीसी बांधकामांवर अखेर रावेर नगरपालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वर्षांनुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या अतिक्रमणांवर पालिकेने थेट नोटिसा बजावत कारवाईचा इशारा दिल्याने अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तीन दिवसांत स्वतःहून अतिक्रमण हटवा, अन्यथा थेट कारवाईचा सामना करा, असा स्पष्ट इशारा पालिकेने दिला आहे.

पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज पाच अतिक्रमणधारकांना नोटिसा पाठवल्या असून, यामध्ये दोन अज्ञात व तीन ओळख पटलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख श्री. राठोड यांनी ही मोहीम राबवली. जुना नाला हा शहरातील प्रमुख जलवाहिनीपैकी एक असून, तो जिल्हा परिषद शाळेजवळून सुरू होऊन मेहतर कॉलनीमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या मागील भागातून जातो. या संपूर्ण नाल्याच्या दोन्ही बाजूंना काही व्यावसायिकांनी आपापली दुकाने वाढवण्यासाठी आरसीसी बांधकाम करून पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर अडथळा निर्माण केल्याचे उघडकीस आले आहे.
या अतिक्रमणांमुळे पावसाळ्यात नाल्याचे पाणी ओसंडून वाहण्याची आणि आजूबाजूच्या परिसरात जलभराव होण्याची शक्यता वाढते. विशेष म्हणजे, स्थानिक नागरिकांनी या अतिक्रमणांची तक्रार प्रसारमाध्यमांतून व सोशल मीडियावर वेळोवेळी केली होती. अखेर या तक्रारींना दाद देत पालिका प्रशासनाने ही धडक मोहीम हाती घेतली आहे.
पालिकेच्या या कारवाईचे शहरात स्वागत होत असून, नागरिकांनी यावर समाधान व्यक्त केले आहे. “वाढते अतिक्रमण हे शहराच्या विकासाला मारक असून, पालिकेने वेळेवर केलेली ही कारवाई योग्य दिशा दाखवणारी आहे,” असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले. नागरिकांचे म्हणणे आहे की, अतिक्रमणाविरोधात अशा प्रकारची सातत्यपूर्ण आणि कठोर कारवाई झाली पाहिजे, म्हणजेच इतर अतिक्रमणधारकांनाही धडा मिळेल.
रावेर पालिकेच्या या कृतीमुळे शहरातील इतर बेकायदेशीर अतिक्रमणांवरही अंकुश बसण्याची शक्यता असून, प्रशासनाचा नवा निर्धार स्पष्टपणे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत अतिक्रमणधारकांनी नोटिसांचे पालन न केल्यास प्रत्यक्ष तोडफोडीची कारवाई केली जाणार आहे, असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.



