Home Cities चाळीसगाव ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ उपक्रमात नागरीकांच्या तक्रारींचे निवारण !

‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ उपक्रमात नागरीकांच्या तक्रारींचे निवारण !


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “जिल्हा परिषद आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी चाळीसगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीत भव्य तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला नागरिकांकडून १०० पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यांचे जागेवरच निवारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या तक्रार निवारण सभेच्या अध्यक्षस्थानी आ. मंगेश चव्हाण आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल स्वतः उपस्थित होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे व चंद्रकांत जगताप, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, अभियंता अमोल पाटील, सुनील जाधव, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सभेत प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आमदारांच्या समोर प्रत्यक्ष सुनावणीद्वारे चर्चा करण्यात आली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेतल्यानंतर, संबंधित विभाग प्रमुखांना तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपले प्रश्न थेट प्रशासकीय पातळीवर मांडण्याची आणि त्यावर तातडीने तोडगा काढण्याची संधी मिळाली आहे.

“जिल्हा परिषद आपल्या दारी” हा उपक्रम नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढविण्यात अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. यामुळे नागरिकांना आपल्या समस्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयात जाण्याची गरज कमी झाली असून, प्रशासन स्वतः त्यांच्या दारी पोहोचत आहे. अशा उपक्रमांमुळे लोकशाहीत प्रशासनाची जबाबदारी आणि पारदर्शकता आणखी वाढते, असे मतही व्यक्त करण्यात आले.


Protected Content

Play sound