जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील वाढता भ्रष्टाचार, मंत्र्यांची बेताल वक्तव्ये, बंद पडलेल्या लोककल्याणकारी योजना आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) ११ ऑगस्ट रोजी जळगावात भव्य जिल्हा मोर्चा काढणार आहे. शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला आणि निराधार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.
या मोर्चाच्या नियोजनासाठी आज (७ ऑगस्ट) शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, गोलानी मार्केट येथे जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोर्चाच्या यशस्वीतेसाठी सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये तालुकाप्रमुख, तालुका संघटक, युवासेना तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि विविध संलग्न संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, दीपक राजपूत, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी आणि निलेश चौधरी आदी प्रमुख नेते उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजूर बांधव मोठ्या संख्येने मोर्चात कसे सहभागी होतील, यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
या मोर्चाद्वारे राज्य सरकारला विविध प्रश्नांवर जाब विचारण्यात येणार आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मागण्या, महिलांचे प्रश्न आणि निराधार व्यक्तींच्या समस्यांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून केला जाईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी केले तर राजेंद्र पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.



