
नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । देशातील विविध विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) कडून सर्व विमानतळांना हाय अलर्टवर ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देत, २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या काळात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे देशभरातील विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार, काही दहशतवादी आणि समाजविरोधी गट विमानतळ, धावपट्ट्या, हवाई दल स्थानके, एअरफील्ड्स आणि हेलिपॅड्स यांना लक्ष्य करू शकतात. विशेषतः पाकिस्तानी दहशतवादी गटांच्या कारवायांशी संबंधित माहितीवर आधारित असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही माहिती गंभीर मानून, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने ४ ऑगस्ट रोजी अधिकृत सूचना जारी करत सर्व सुरक्षा यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
या आदेशानुसार, स्थानिक पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), गुप्तचर यंत्रणा आणि इतर संबंधित सुरक्षा विभागांनी आपापसात समन्वय ठेवत संयुक्त कारवाई करावी. विमानतळ टर्मिनल परिसर, प्रवासी वाहतूक क्षेत्र, पार्किंग, लॉबी, बॅगेज क्लेम एरिया आणि इतर संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवण्यात यावी, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. सर्व सीसीटीव्ही यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवण्यास सांगितले असून, कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा वस्तू आढळल्यास तात्काळ तपासणी करण्याचे आदेश आहेत.
या पार्श्वभूमीवर, प्रवाशांनी देखील सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या असून, कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास तात्काळ विमानतळ प्रशासनास किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर आधीच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, प्रत्येक प्रवेशद्वारावर काटेकोर तपासणी सुरू आहे.



