भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मैत्री दिवस म्हणजे नात्यांचेCelebration! आणि हे नाते साजरे करण्याचा एक आगळा-वेगळा मार्ग भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंनी निवडला – ‘धावत साजरा केलेला मैत्री दिवस’! ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी सकाळच्या पहाटे, तब्बल दहा किलोमीटर एकत्र धावत त्यांनी मैत्रीला चालती-फिरती, दमदार सलामी दिली.
रविवारी पहाटे ५.१५ वाजता सर्व धावपटू रेल्वे क्रीडांगणासमोरील श्रीकृष्णचंद्र सभागृहाजवळ एकत्र जमले. वॉर्मअपसह सरावाला सुरुवात झाली आणि नंतर आरपीडी रोडवरून एकत्र दहा किलोमीटर अंतर धावण्यात आले. हवामानातील आद्रतेमुळे धावण्याचा अनुभव अधिकच आव्हानात्मक ठरला, पण प्रत्येकाने निर्धाराने आणि एकमेकांना साथ देत हे अंतर पूर्ण केले. धावून आल्यानंतर मैदानावर सर्वांनी एकत्र स्ट्रेचिंग करून शरीराला विश्रांती दिली.

या अनोख्या उपक्रमात स्त्रियांचा उत्साह विशेष उल्लेखनीय होता. प्रत्येक महिला धावपटूने आपल्या मैत्रिणीसाठी खास फ्रेंडशिप बँड आणले होते. मैत्रीच्या या रंगीत धाग्यांनी मैत्रिणींच्या चेहऱ्यावर आनंदाचा झळाळता प्रकाश पसरवला. हे बंध अधिक घट्ट करण्यासाठी सर्वांनी एकमेकांना पुढील मॅरेथॉन स्पर्धांमध्ये एकत्र सहभागी होण्याचे आश्वासन दिले आणि आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.
मैत्री आणि जोडीदारपणाचे नाते अधोरेखित करत स्वाती व प्रवीण फालक, सरला व महेंद्र पाटील, तसेच पुष्पा व संजय तिवारी या दांपत्यांनी एकत्र धावून पती-पत्नीही खरे मित्र असावेत, असा सकारात्मक संदेश दिला. याशिवाय सारंग चौधरी, मंगेश यावलकर, प्रशांत चौधरी, डॉ. निर्मल बलके, दर्शन नागदेव, राजीव यादव, राजेंद्र ठाकूर, हर्षल लोखंडे, गणसिंग पाटील, प्रविण पाटील, रमेशसिंग पाटील आणि सुधीर पाचपांडे यांनीही एकत्रितपणे दहा किलोमीटरचा पल्ला पार केला.
महिला धावपटूंमध्ये डॉ. चारुलता पाटील, माधुरी चौधरी, एकता भगत, मंगला पाटील, संगीता चौधरी, स्वाती भोळे, जयश्री चौधरी, मनीषा सिंग, रीना परदेशी, सुनिता वाघमारे, सीमा वायकर, चंपा जांगिड, गुड्डी देवी, जयश्री तिकोडकर, विजया निकम, मंजुषा कुलकर्णी आणि रेवती मांडे यांनी सामूहिक सहभागाने एक आनंददायी मॅरेथॉन अनुभव घेतला.



