Home क्राईम जानवी इलेक्ट्रिकलला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्याची नागरिकांची मागणी

जानवी इलेक्ट्रिकलला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्याची नागरिकांची मागणी


 मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर महावितरण विभागाच्या सारोळा येथील गाळणी कक्षात घडलेल्या ऑइल चोरीच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. जुने ट्रांसफार्मर जमा करून नवीन ट्रांसफार्मर पुरवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या जानवी इलेक्ट्रिकल या ठेकेदार कंपनीने ट्रांसफार्मरमधील ऑइल चोरल्याचा स्पष्ट आरोप होत असून, याबाबत महावितरणकडून पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरीही संबंधित कंपनीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दि. २५ जुलै २०२५ रोजी जानवी इलेक्ट्रिकल या कंपनीच्या MH 28-H-7748 क्रमांकाच्या वाहनाची तपासणी महावितरणच्या गाळणी कक्षातील अधिकाऱ्यांनी केली असता, त्या वाहनाच्या डिझेल टाकीत महावितरणच्या जळालेल्या ट्रांसफार्मरमधील ऑइल आढळून आले. सदर प्रकाराबाबत तात्काळ कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांना सूचित करण्यात आले. त्यांच्या सूचनेनुसार वाहन गाळणी कक्षातच ठेवण्यात आले आणि शनिवारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गाळणी कक्षातील वाहनांतील डिझेल टाक्यांचे सॅम्पल घेण्यात आले. यावेळी जानवी इलेक्ट्रिकलच्या वाहनात ट्रांसफार्मर ऑइल असल्याचे निश्चित झाले.

या घटनेनंतर दि. २६ जुलै २०२५ रोजी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. परंतु आजतागायत या प्रकरणात कोणतीही गुन्हेगारी कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे, संबंधित वाहनावरील मजुरांनी लेखी स्वरूपात आपली चोरी स्वीकारल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. काही मजूरांनी दबावाखाली किंवा आर्थिक प्रलोभनाने चोरी कबूल केल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नियमांनुसार जबाबदारी ही संबंधित कंपनीची असून जानवी इलेक्ट्रिकलवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

या पार्श्वभूमीवर महावितरणकडून केवळ पोलीस तक्रारीपुरते मर्यादित राहणे आणि ठेकेदार कंपनीविरोधात थेट कारवाई न होणे यामुळे जानवी इलेक्ट्रिकलला ‘छुपा आशीर्वाद’ मिळत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यापूर्वीदेखील महावितरणमधून लाखो रुपयांचे विद्युत साहित्य व ऑइल चोरी गेले असल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. परंतु त्या प्रकरणांतही चौकशी व कारवाईची प्रक्रिया कुचकामी ठरली.

सारोळा गाळणी कक्षातील या प्रकारामुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी आता जानवी इलेक्ट्रिकलला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्याची तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व कामांची बिले थांबवण्याची मागणी केली आहे. यामुळे भविष्यात कोणताही ठेकेदार शासकीय मालमत्तेची चोरी करण्यापूर्वी दहावेळा विचार करेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. महावितरणने जर वेळेवर कठोर निर्णय घेतला नाही, तर या प्रकारांमुळे विभागाची प्रतिमा आणि शासकीय मालमत्तेचे संरक्षण यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार हे निश्चित.


Protected Content

Play sound