मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड बाजार समितीचे विभाजन करण्यात आले असून यातून मुक्ताईनगरसाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजारपेठ स्थापन करण्यात आली असून याबाबतचे अध्यादेश जारी करण्यात आले आहेत.

आजवर बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत बोदवडसह मुक्ताईनगर तालुका आणि भुसावळ तालुक्यातील काही गावांचा समावेश होता. या बाजार समितीचे विभाजन करून मुक्ताईनगरला स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती व्हावी अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करून स्वतंत्र बाजार समिती मंजूर करून आणली होती. या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी एका अध्यादेशाच्या माध्यमातून बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

या अध्यादेशानुसार बोदवड बाजार समितीत आता बोदवड तालुक्यासह भुसावळ तालुक्यातील काही गावांचा समावेश असेल. या बाजार समितीचे वरणगाव आणि जामठी येथे उपबाजार असतील. तर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मुक्ताईनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय हे मुक्ताईनगर येथे राहणार असून अंतुर्ली आणि कुऱ्हा येथे उपबाजार राहणार आहेत.
दरम्यान, बोदवड बाजार समितीची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. तेथे सहायक निबंधक नंदराज साळवे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुक्ताईनगर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भुसावळ येथील सहायक निबंधक डी. व्ही. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या बोदवड व नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मुक्ताईनगर बाजार समितीत आता प्रशासकराज सुरू झाले असून येत्या काही महिन्यांमध्ये यासाठी निवडणूक घेण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.



