जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), तसेच विशेष मागास प्रवर्गातील (SBC) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सुरू केली आहे. या योजनेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना थेट बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाणार असून, त्या माध्यमातून त्यांना भोजन, निवास व शैक्षणिक साहित्याची सुविधा मिळणार आहे.
या योजनेचा लाभ महापालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरावरील किंवा तालुकास्तरावरील महाविद्यालयांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या योजनेंतर्गत प्रथम ते चतुर्थ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांपैकी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेतलेल्यांनाच पात्र मानले जाणार आहे. यामध्ये दरवर्षी १५० आणि एकूण ६०० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, केवळ अशा विद्यार्थ्यांनाच लाभ मिळणार आहे, ज्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही.

विशेष बाब म्हणून, भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेपासून वगळण्यात आले आहे. बी.ए., बी.कॉम., बी.एससी., एम.ए., एम.एससी. यांसारख्या अव्यवसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये १२ वी नंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खुली असून, अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १७ ऑगस्ट २०२५ पर्यंतच करता येतील. ऑफलाइन अर्ज कोणत्याही स्वरूपात स्वीकारले जाणार नाहीत.
ही योजना विशेषतः प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देणार आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज प्रक्रिया आणि वेळापत्रक वेगळे जाहीर करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जळगाव येथे थेट संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक योगेश पाटील यांनी केले आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक आधार मिळून उच्च शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.



