यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक, यावल शाखेच्या वतीने भव्य वित्तीय साक्षरता अभियान व कर्जवाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमात महिलांच्या स्वयंसहायता बचत गटांना तब्बल ३०.२५ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. शंभराहून अधिक महिलांची उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमाने ग्रामीण भागातील महिलांना नवसंजीवनी दिली.
या कर्जवाटप मेळाव्यात यावल तालुक्यातील एकूण १० स्वयंसहायता समूहांना बँकेच्या वतीने कर्ज मंजूर करण्यात आले. कार्यक्रमासाठी यावल शाखेचे शाखा व्यवस्थापक सचिन सूर्यभान काकडे, उमेद तालुका समन्वयक अमोल झाडे व शरद शेंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान बँक सखी म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्ज घेतलेल्या आणि यशस्वी व्यवसाय उभारलेल्या महिलांनी स्वतःचा प्रवास उलगडत प्रेरणादायी अनुभव शेअर केले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वयं सहायता गटांना कर्ज मंजुरी पत्र आणि प्रतिनिधिक स्वरूपातील धनादेश वितरित करण्यात आले. यामुळे महिलांना वैयक्तिक तसेच सामूहिक स्तरावर छोटे उद्योग सुरू करण्यासाठी चालना मिळाली आहे. अध्यक्षीय भाषणात शाखा व्यवस्थापक सचिन काकडे यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती देत महिलांनी स्थानिक उत्पादनांचा दर्जा वाढवून ऑनलाईन विक्रीच्या संधी शोधाव्यात असे आवाहन केले. त्यांनी कर्जवाटप प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही, याची ग्वाही देत भविष्यात अधिक रकमेचे कर्ज दिले जाईल, असे सांगितले.
उमेदचे तालुका समन्वयक अमोल झाडे आणि शरद शेंडे यांनी गटांच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी १००% कर्ज परतफेडीचे उद्दिष्ट गाठण्याचे आश्वासन दिले. यावेळी बँकेच्या अधिकारी जानवी खोडे, वैशाली नगराळे, रोखपाल चेतनसिंग राजपूत यांनी महिलांना अर्थविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शाखेचे कर्मचारी महेश खाचणे, भूषण महाजन व बँक सखी अश्विनी कोळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
यावलसारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला उमेद अंतर्गत महिला गटांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी आयोजित हा उपक्रम निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.



