Home Cities जळगाव विश्व मानव तस्करी विरोधी दिवस: जळगाव रेल्वे स्थानकात जनजागृती

विश्व मानव तस्करी विरोधी दिवस: जळगाव रेल्वे स्थानकात जनजागृती


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘विश्व मानव तस्करी विरोधी दिवस’ निमित्त जळगाव रेल्वे स्थानकात आधार बहुउद्देशीय संस्था, रेल्वे सुरक्षा बल (RPF) जळगाव आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता एका जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मानव तस्करीविरोधात समाजात जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल निरीक्षण गृहाचे अधीक्षक रविकिरण अहिरराव होते. व्यासपीठावर रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक अमित कुमार यादव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या ॲड. शिल्पा रावेरकर, बाल संरक्षण समितीचे पवन पाटील, जीआरपी पोलीस निरीक्षक ए. आर. नगराळे, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील आणि स्टेशन अधीक्षक कौस्तुभ चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान, रेल्वेमार्गे होणाऱ्या बालकांच्या मानव तस्करीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. मानव तस्करीचे प्रकार, त्यापासून मुलांना कसे वाचवता येईल आणि अशा घटनांची माहिती पोलिसांना कशी द्यावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मानव तस्करी हा एक गंभीर गुन्हा असून, तो रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी, मानव तस्करी रोखण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये नरेंद्र परदेशी (एसआय), शिवपूजन सिंग (एसआय), कॉन्स्टेबल पंकज वाघ, कॉन्स्टेबल सुनील कुमार, कॉन्स्टेबल चौधरी आणि कॉन्स्टेबल विनोद जेठवे यांचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये आणि स्थानकावरील कर्मचाऱ्यांमध्ये मानव तस्करीविरोधात महत्त्वाची जनजागृती झाली.


Protected Content

Play sound