अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खान्देश शिक्षण मंडळ संचालित फार्मसी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. रविंद्र गंगाराम माळी यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम (भारत सरकार)तर्फे २७ जुलै रोजी नंदुरबार येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील नामवंत मान्यवरांची उपस्थिती होती. प्रा. माळी हे गेली २७ वर्षे अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग, संशोधन, शोधनिबंध लेखन आणि राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासमंडळावर करण्यात आली आहे. तसेच प्राण्यांवरील प्रयोगांसाठी गठीत केंद्रीय समितीवरही त्यांचा समावेश करण्यात आला आहे, जे त्यांच्या शैक्षणिक व्यासंगाची पावती आहे.

प्रा. माळी यांनी फार्मसी शिक्षण क्षेत्रात नवोन्मेषी दृष्टिकोन राबवला असून, विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारे उपक्रम सातत्याने राबवले आहेत. त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र, प्रकल्प कार्यशाळा व शैक्षणिक सहलींचे आयोजन करत शिक्षणाला प्रात्यक्षिक स्वरूप दिले आहे. त्याचबरोबर, त्यांनी सामाजिक संस्था, आरोग्य शिबिरे व ग्रामीण भागातील जनजागृती कार्यक्रमांमध्येही सक्रीय सहभाग घेतला आहे.
या पुरस्कारामुळे प्रा. माळी यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाली आहे. त्यांच्या या सन्मानानंतर महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी व सहकाऱ्यांनी आनंद व्यक्त करत त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. अनेक सामाजिक संस्थांनीही या पुरस्काराबद्दल त्यांचा सत्कार करत गौरव केला आहे.



