Home Cities जळगाव शिक्षणाचे महत्त्व आणि सर्वधर्म समभावाचा संदेश; संत नामदेवांच्या कार्याचे कीर्तनातून स्मरण

शिक्षणाचे महत्त्व आणि सर्वधर्म समभावाचा संदेश; संत नामदेवांच्या कार्याचे कीर्तनातून स्मरण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित शिव कॉलनी आशा बाबा परिसर सावित्रीबाई महिला मंडळाच्या वतीने रविवार, २७ जुलै रोजी रात्री ८ वाजता शिव कॉलनी, गणपती मंदिर, गट नंबर ६० येथे संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज गुरुवर्य मुरारी नामदास महाराजांच्या हरि कीर्तन सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

या कीर्तन सोहळ्यात मुरारी महाराजांनी संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग कथन केले. त्यांनी सांगितले की, संत नामदेव महाराज हे एक राष्ट्रीय संत होते, ज्यांनी सर्व समाजाला एकत्र जोडण्याचे महान कार्य केले. ते शिक्षणाचे पहिले प्रणेते होते आणि त्यांनी जनाबाईंना अभंग, ओव्या व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले होते.

मुरारी महाराजांनी पुढे सांगितले की, संत नामदेव महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना आणि संतांना एकत्र आणण्याचे कार्य केले. त्यामुळेच त्यांना ‘राष्ट्रीय एकात्मतेचे संत’ म्हणूनही ओळखले जाते. पंढरपूर ते घुमान (पंजाब) पर्यंत भागवत धर्माची पताका नेऊन त्यांनी धर्माचे मोठे कार्य केले, तसेच मुघल काळात हिंदू धर्माच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असेही त्यांनी या कीर्तन सोहळ्याप्रसंगी नमूद केले.

या कीर्तन सोहळ्याला प्रदेश भाजपा महिला उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील आणि माजी महापौर सीमाताई भोळे यांनी उपस्थिती लावून मुरारी महाराजांचे पाद्यपूजन केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी समाजबांधव आणि परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound