Home क्राईम घरफोडीतील संशयित अखेर जेरबंद; चार महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा

घरफोडीतील संशयित अखेर जेरबंद; चार महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीतील गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा अट्टल घरफोडी करणारा आरोपी मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह (वय २४, रा. मस्जिद जवळ, शिरसोली ता.जि. जळगाव) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सिंधी कॉलनी परिसरातून अटक केली आहे. त्याला रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रामानंद नगर पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर २०२४ रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात यापुर्वी सागर शिवराम डोईफोडे (वय-२८, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याला १४ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक केली होती. त्याने चोरीचा मुद्देमाल पोलीसांना दिला होता. दरम्यान सागर डोईफोडे याने हा गुन्हा त्याचा साथीदार मुस्तिकीन उर्फ जुनेद भिकन शाह, रवी प्रकाश चव्हाण आणि नितीन चव्हाण (सर्व रा. तांबापुरा, जळगाव) यांच्या सोबत केल्याची कबुली दिली. तेव्हापासून हे संशयित फरार होते.

दरम्यान, आरोपी मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह याला पोलिसांच्या शोधाची कुणकुण लागल्याने तो सुरत येथे पळून गेला होता. परंतु, २७ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा अक्रम शेख आणि पोशि रवींद्र कापडणे यांना गुप्त माहिती मिळाली की, मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह जळगाव शहरात येणार आहे. या माहितीची खात्री करून त्यांनी सिंधी कॉलनी परिसरात दुपारी ३ वाजता सापळा रचला आणि मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह यास ताब्यात घेतले. त्याने अजून इतर चार घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. सोमवारी २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहवा अक्रम शेख, विजय पाटील, नितीन बावीस्कर, प्रवीण भालेराव, पोना किशोर पाटील, पोशि रवींद्र कापडणे, चापोशि महेश सोमवंशी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.


Protected Content

Play sound